पुणे : शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी (पिंक) रिक्षा खरेदी करण्यास अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने नुकतीच ‘पिंक ई रिक्षा’ ही योजना राज्यात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ई-रिक्षाची किंमत तीन लाख ७३ हजार आहे. त्यापैकी लाभार्थी महिलांनी केवळ ३७ हजार ३०० रुपये भरायचे आहेत. शासनाकडून ७४ हजार ६०० रुपये दिले जाणार आहेत. या रिक्षासाठी कर्जाचा व्याजदर ९.३ अधिक २.७५ टक्के असून संबंधित महिलांनी पाच वर्षांमध्ये महिन्याला सहा हजार रुपयांचा हप्ता भरून याची परतफेड करायची आहे. पिंक ई-रिक्षाच्या दर तीन महिन्यांनी एक याप्रमाणे पाच वर्षांसाठी २० दुरुस्ती सेवा (सर्व्हिसिंग) देखील मोफत दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा >>>शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल

या रिक्षांची नोंदणी आणि विमा वितरकांकडून मोफत काढला जाणार आहे. तसेच संबंधित लाभार्थी महिलांना ही रिक्षा चालविण्यासाठीचे प्रशिक्षण आणि वाहन परवानादेखील या वितरकांंमार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रिक्षांसाठीचा भाडेदर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत निश्चित केला जाणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील समाज विकास विभागाच्या कार्यालयात या योजनेची माहिती मिळणार असल्याचे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.

पिंक रिक्षा योजनेमुळे गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या समाज विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या समाजकल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation decision regarding pink rickshaws pune print news ccm 82 amy