पुणे : शहरातील ज्या भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरविले जाते, त्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पाण्याचा टँकर अन्य ठिकाणी गेल्यास त्याची जबाबदारी संबधित कर्मचाऱ्यांवर येणार असल्याने, आता तरी टँकरमधून होणाऱ्या पाणीचोरीच्या प्रकारांना आळा बसेल, अशी महापालिकेला आशा आहे.
शहरातील ज्या भागांना महापालिकेच्या वतीने पाणी दिले जात नाही, अशा ठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाण्याचे टँकर दिले जातात. या टँकरना ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ (जीपीएस) बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे टँकरवर नियंत्रण ठेवले जाते. यासाठीचा लॉग-इन आणि पासवर्ड पाणीपुरवठा विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. या अधिकाऱ्यांकडे या कामाव्यतिरिक्त अन्य अनेक कामे असल्याने त्यांना हे काम प्राधान्याने करणे शक्य होत नव्हते.
दुसरीकडे, टँकरसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतरदेखील अनेक टँकरचालक महापालिकेचे पाणी संबधितांना देत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे येत आहेत. टँकरवर लावण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणेचा वापर होत नसल्याने महापालिकेचे पाण्याचे टँकर नक्की कोठे जातात, याचा उलगडा पाणीपुरवठा विभागाला होत नव्हता.
त्यामुळे जीपीएस यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे द्यावी, अशी मागणी स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून केली जात होती. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. त्यांना लाॅग-इन आयडी, पासवर्ड दिला जाणार आहे. टँकर कुठे आणि कधी पाठविण्यात आले, याचा दैनंंदिन अहवाल संबधितांकडून घेतला जाणार आहे.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ठेकेदारामार्फत दिले जाणारे पाणी योग्य ठिकाणी जाते की नाही, हे समजणे आवश्यक आहे. टँकर पाॅइंटवरील कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली होती. यामुळे पाण्याचे टँकर इतर ठिकाणी जात असतील, तर त्याला आळा बसेल.