शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागाला आता नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. यंदा चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे चार जुलैपासून ११ जुलैपर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. त्यानुसार शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. दरम्यान, आषाढी एकादशी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै पर्यंत पाणीकपात तात्पुरती रद्द करण्यात आली होती. या दरम्यान धरण परिसरात संततधार सुरू झाल्याने २६ जुलै पर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सध्या शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सहा जुलैपासून सक्रिय झाला. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस ओसरला असला तरी चारही धरणांत मिळून वीस अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आला असून शहराच्या सर्व भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.