देशात आणि राज्यातही Delta Plus Variant चा नवा धोका निर्माण झालेला असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निर्बंधांमधील सूट आता मिळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने देखील शहरातील नियमावलीमध्ये बदल केले असून नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यानुसार, अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहणार असून या सेवा वगळता इतर प्रकारच्या दुकानांना फक्त सोमवार ते शुक्रवार यादरम्यानच मुभा देण्यात आली आहे.

 

pune lockdown guidelines two
पुणे महानगर पालिकेने लॉकडाउनसंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे.

काय आहेत नियम?

पुणे पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमध्ये पुढील सूचनांचा समावेश आहे..

> अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांना दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

> अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. ही दुकाने फक्त सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहतील.

> हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये ५० टक्के आसन व्यवस्थेच्या मर्यादेत सुरू राहतील. मात्र, शनिवार-रविवार फक्त पार्सल किंवा होम डिलिव्हरीची सेवा उपलब्ध असेल.

> सामाजिक, धार्मिक किंवा मनोरंजनपर कार्यक्रमांना देखील फक्त सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्येच परवानगी असेल. यासाठी ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. शनिवार-रविवार अशा कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.

> जिम, सलून, स्पा या गोष्टी शनिवार-रविवारी फक्त संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच खुल्या राहतील.

> वाईन शॉप सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहतील.

> मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे ही बंदच राहतील.

< पीएमपीएमएल बसेस ५० टक्के क्षमतेनं सुर राहतील. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.

< पुणे शहरात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर प्रतिबंध असेल. तर संध्याकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल.

< ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याची परवानगी असेल.

< लग्न समारंभासाठी ५० लोकांची आणि अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची परवानगी असेल.

< पुणे मनपा हद्दीतल्या खासगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी क्षमतेनं काम करण्याची परवानगी. ही कार्यालये सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील.

pune lockdown guidelines
पुणे महानगर पालिकेने लॉकडाउनसंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे.

 

दरम्यान, नव्याने जाहीर करण्यात आलेले नियम सोमवारपासून म्हणजेच २८ जूनपासून लागू होतील असं देखील पुणे महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुणे महानगर पालिकेच्या क्षेत्रातील भागांमध्ये हे नियम लागू असतील.