पुणे : पूरनियंत्रणासाठी शहरातील नाले, ओढे यांच्या बाजूला सीमाभिंती बांधण्यासाठी पुणे महापालिकेला २०० कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. मात्र, सहा महिन्यांहून अधिक काळ उलटल्यानंतरही हा निधी अद्यापही महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नाले, ओढे यांच्याभोवती सीमाभिंत बांधण्याचे काम पूर्ण होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा वर्षांपूर्वी २०१९ मध्ये शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. यामध्ये अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या होत्या. तसेच, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. पार्किंगमध्ये उभी वाहने वाहून गेली होती. या सोसायट्या खासगी असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला खर्च करण्यास अडचण येत होती. परिणामी ही कामे रखडली होती.

ही कामे करण्याासाठी राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी महापालिकेत त्यावेळी सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावादेखील केला जात होता. याची दखल घेऊन ‘महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ याअंतर्गत राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला.

या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षणभिंती बांधण्यात येणार आहेत. विशेषतः याचा फायदा आंबील ओढा परिसराला होणार होता. गेल्या वर्षी २०२४ मध्ये राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत हा निधीच महापालिकेकडे आलेला नाही.

सीमाभिंत बांधण्यासाठी निधी मिळणार असल्याचे लक्षात आल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शहरातील आमदारांच्या दबावाखाली महापालिका प्रशासनाने जुन्या प्रस्तावित कामांमध्ये बदल केला. नवीन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून शहरातील सत्ताधारी महायुतीच्या आमदारांच्या प्रभागातील नाल्यांच्या कामांसाठी हा निधी देण्यात आला. त्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपही झाले. महापालिकेने या नवीन प्रस्तावित कामांच्या निविदाही काढल्या आहेत. मात्र, अद्यापही राज्य सरकारचा निधी न आल्याने या निविदा थांबविण्यात आल्या आहेत.