पुणे : महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्यांसाठी अभय योजना आणण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याला शहरातील स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विरोध केला आहे. यापूर्वी आणलेल्या अभय योजनेचा अनुभव लक्षात घेऊन महापालिकेने हा विचार बंद करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या एक हजार थकबाकीदारांची नावेदेखील काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती.
महापालिकेने यापूर्वीही दोन वेळा अभय योजना जाहीर केली होती. त्याचा फायदा घेऊन अनेक थकबाकीदारांनी आपला दंड रद्द करुन घेतला. यामध्ये महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यानंतरही सध्या ३०० ते ३५० कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेची आहे.
अभय योजनेचा फायदा उठवित थकबाकी भरणाऱ्या ५० टक्के मिळकतदारांकडेच नव्याने पुन्हा थकबाकी राहिली आहे. महापालिकेने पुन्हा अभय योजना आणल्यास त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. जे मिळकतदार नियमितपणे कर भरतात त्यांच्यावर हा अन्याय आहे, असे वेलणकर म्हणाले.
मिळकतकराची अभय योजना आणण्यास ‘आपले पुणे’ संघटनेनेही विरोध केला आहे. माजी नगरसेवक उज्व्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी पत्रक प्रसिद्ध करून विरोध दर्शविला आहे. ‘अभय योजना आणणे म्हणजे, शहरातील प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय आहे. अभय योजना म्हणजे कर बुडवणाऱ्या लोकांना सन्मान मिळतो, एका नवीन प्रवृत्तीला महापालिका जन्म देते. ‘अभय’ योजना आणायची ही एक छोटीशी प्रथा आणि पायंडा पुणे महानगरपालिकेमध्ये पडत आहे,’ असे केसकर म्हणाले. ‘महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकविणाऱ्यांना महानगरपालिकेचे ‘भय’ निर्माण होईल, अशी पद्धती महापालिकेने आणली पाहिजे,’ असेही ते म्हणाले.