पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून, उत्तर देण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, लिपिक मनोज पानसे आणि शिपाई बाबा इनामदार यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी बजावली आहे. याबाबत डॉ. बळिवंत यांच्याकडे रुग्ण हक्क परिषदेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजाविण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यास तिघांनाही दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

हेही वाचा : शालेय अभ्यासक्रम आराखड्यातून मनुस्मृतीचा संदर्भ काढून टाकणार; आराखड्यावर ३९०० हरकती, सूचना

आरोग्य प्रमुखांकडे दाखल तक्रारीत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, शहरी गरीब योजना खिळखिळी करण्याचे काम सुरू आहे. गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील मोठ्या रुग्णालयांकडून या योजनेची देयके मंजूर करून घेण्यासाठी मोठी लाच स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून त्यांची चौकशी करावी.

हेही वाचा : पुण्यात सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी मोठे पाऊल! मराठा चेंबरचा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियासोबत करार

आरोग्य विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यास दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर याबाबतचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केला जाईल.

डॉ. कल्पना बळिवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation enquiry of health department after suspension of health chief pune print news stj 05 css