गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने महापालिका आयुक्त कार्यालयाला दिला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर या मुदतवाढीचा निर्णय होणार आहे. शहरामध्ये अर्धा गुंठा, एक गुंठा आणि दोन गुंठे अशा जागांवर छोटी-छोटी बांधकामे करण्यात आली आहेत. ही संख्या जवळपास ७० हजारांच्या आसपास असल्याची नोंद महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे महापालिकेकडून पुन्हा उरुळी देवाची, फुरसुंगीत विकासकामे… ‘एवढ्या’ कोटींच्या कामांना मंजुरी

राज्य शासनाने गुंठेवातीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र कागदपत्रांची पूर्तता, आकारले जाणारे शुल्क तसेच किचकट नियमांमुळे बांधकामे नियमित करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिकेकडे गुंठेवारीसाठी ८५६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील केवळ २१ प्रकरणे मंजूर झाली असून, ५४७ प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. तर २८९ प्रकरणे मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या योजनेसाठी ३१ जुलै २०२३ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. ती संपल्यामुळे गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करण्यासाठीची मुदत चार महिन्यांनी वाढविली असून, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. तसा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation extends deadline to regularize construction in gunthewari pune print news apk 13 zws