पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शहरातील स्वच्छता पाहण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेले आहेत. त्यानुसार अस्वच्छता पसरवणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे.
रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, विनापरवाना भिंती रंगविणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे अशा विविध कारणांसाठी नागरिकांकडून दंड आकारला जातो. सार्वजनिक रस्त्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात महापालिकेने कारवाई केली आहे. कोथरुड येथील कमिन्स कंपनीच्या मागील रस्त्यावर हा कचरा टाकण्यात आला होता. महापालिकेने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या या व्यक्तीचे नाव, पत्ता शोधून त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहर स्वच्छ राहावे यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देखील वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये तसेच आपले शहर स्वच्छ कसे राहील याकडे लक्ष द्यावे याकरिता महापालिकेच्या वतीने जनजागृती केली जाते. मात्र याकडे दुर्लक्ष करत अस्वच्छता केली जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. कोथरूड परिसरात महापालिकेचे आरोग्य निरीक्षक करण कुंभार व मुकादम वैजीनाथ गायकवाड हे आपल्या हद्दीत पाहाणी करत होते.
त्यावेळी त्यांना कमिन्स कंपनीमागील रस्त्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याचे आढळले. त्यानंतर कुंभार व गायकवाड यांनी या कचऱ्यात हात घालून संबंधित व्यक्तीचा पत्ता व मोबाइल क्रमांक शोधून काढला. महापालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई केली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील आरोग्य कोठी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
कचरा टाकणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याने टाकलेल्या कचऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने कचरा टाकल्याची कबुली दिली. मात्र, आपण पुण्यात नाही, बाहेरगावी असल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला समज देत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सुनावण्यात आले.
त्यामुळे संबंधित व्यक्तीने ऑनलाइन पद्धतीने दंड भरला. परिमंडळ उपायुक्त अविनाश सपकाळ, उपायुक्त संदीप कदम, सहायक आयुक्त विजय नायकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.