पुणे : होळीसाठी शहरात वृक्षतोडीचे प्रकार होतात. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. होळीसाठी वृक्षतोड करताना आढळल्यास संबंधित नागरिकांना एक लाख रुपयांचा दंड केला जाणार आहे.

शहरात गेल्या काही वर्षांमध्ये होळीसाठी सर्रास झाडे तोडण्याचे प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्याासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात आज, १३ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे. हा सण दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीसाठी शेणाच्या गोवऱ्या, तसेच वाळलेल्या लाकडांचा, झाडाच्या पालापाचोळ्याचा वापर केला जातो. मात्र, काही ठिकाणी झाडे बेकायदारीत्या तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात.

शहरालगत असलेल्या वन विभागाच्या हद्दीमधील, तसेच नदीकाठ आणि आजूबाजूच्या भागातील झाडे होळीसाठी तोडली जातात. याबाबतच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर महापालिका प्रशासनाने झाडे तोडून त्याचा वापर होळीसाठी केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, कोणतीही परवानगी न घेता झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडाला हानी पोहचविणे, असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची तरतूद आहे. याचा आधार घेत महापालिकेने झाडे तोडणाऱ्याला एक लाख रुपयांचा दंड करण्याचा इशारा दिला आहे.

बेकायदा वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत तक्रार करण्यासाठी महापालिकेने विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. या क्रमांकांवर नागरिकांना तक्रार करता येईल. तक्रार आल्यानंतर तिची शहानिशा केली जाईल. तथ्य आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून त्याच्याकडून दंड घेतला जाईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले की, वृक्षतोड करण्यास बंदी आहे. नवीन कायद्यामध्ये झाडे तोडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात खटला चालविला जातो. या कायद्यानुसार एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड होत असल्यास नागरिकांनी हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी.

उपनगरांमध्ये वापर अधिक

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळी करण्यासाठी झाडे तोडण्याचे प्रकार हे उपनगरांमध्ये अधिक घडतात. हडपसर, कात्रज, लोहगाव, वडगाव शेरी या भागासह सिंहगड रस्त्यांवरही हे प्रकार अधिक प्रमाणात घडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथे करा तक्रार

विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्यास किंवा घडलेले असल्यास याची माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना संपर्क साधता यावा, यासाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर, ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येईल. तसेच ९६८९९३८५२३, ९६८९९३००२४ या मोबाइल क्रमांकावरही तक्रार करता येणार आहे.

Story img Loader