पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीने मार्गी लागावा, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र दोन समित्यांची नियुक्ती केली आहे. उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली या समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यांना विहीत कालमर्यादेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असले, तरी त्याची कालमर्यादा निश्चित केलेली नाही.
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण आणि विस्ताराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूददेखील करण्यात आलेली आहे. या दोन्ही स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी सुमारे ५ हजार ३१० चौरस मीटर, तर रस्त्यासाठी २९८ चौरस मीटर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. भूसंपादन करताना येथे अनेक जुनी घरे असून, त्यात जुने भाडेकरू राहत असल्याने जागा ताब्यात घेताना जागामालक आणि भाडेकरू यांनाही भूसंपादनाचा मोबदला द्यावा लागणार आहे. हा मोबदला कसा दिला जाणार, यावरून स्थानिक नागरिकांमध्ये मतभेद असल्याने भूसंपदनामध्ये अडथळे येत आहेत.
महापालिकेचे उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यामध्ये ११ स्थापत्य अभियंत्यांचा, एका वरिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. सर्वेक्षणासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त किसन दगडखैर यांच्या नेतृत्वाखाली एक कनिष्ठ अभियंता, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडील १५ टंकलेखक, कर आकारणी विभागाकडील सहा उप अधीक्षक व निरीक्षक आणि घनकचरा विभागाकडील १२ निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक एकत्रीकरण, विस्तारीकरण यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण समितीने येथील प्रत्येक मिळकतीला भेट देऊन जागामालक, भाडेकरू, क्षेत्र, मोबदल्याचे स्वरूप अशी माहिती घ्यायची आहे. संपादन समितीने मोबदला कसा देता येईल, याचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)