पुणे : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी आता घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून रात्रीची गस्त घातली जाणार आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर शहरात ही योजना राबविण्यात येणार असून या भरारी पथकासाठी पहिल्या टप्प्यात चार गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या गाड्या क्षेत्रीय कार्यालयांकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असेल तर प्रशासकीय शुल्क आकारणे आदी कामे या भरारी पथकाकडून केली जाणार आहेत.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागांवर, रस्त्यांवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या अनुषंगाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर इंदूर शहराच्या धर्तीवर रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार एकूण १८ गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या गाड्या हडपसर-मुंढवा, कोथरूड-बावधन, नगर रस्ता-वडगावशेरी या तीन क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच प्लास्टिक कारवाई पथकाला एक गाडी देण्यात आली आहे.
हेही वाचा…एम.फिल. प्रवेशबंदीतून दोन विषयांना सूट, कोणत्या विषयांना प्रवेश मिळणार? युजीसीने दिली माहिती…
अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संदीप कदम, मोटार वाहन विभागाचे उपआयुक्त जयंत भोसेकर, प्रसाद काटककर यांच्या उपस्थितीत गाड्या हस्तांतरित करण्यात आल्या. गस्ती पथकासाठी एकूण १८ गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. वाहन खरेदीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या गाड्यांवर अत्याधुनिक पब्लिक ॲड्रेस सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामध्ये ध्वनिक्षेपक, मायक्रोफोन, ॲम्प्लीफायर अशी अद्ययावत उपकरणे असून या पथकाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी या गाड्यांमध्ये भरारी पथकाचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.