पुणे : पुणे महापालिकेत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सुरू करण्यात आलेला तक्रार निवारण कक्ष गुरुवारी सुरू झाला. पहिल्याच दिवशी या कक्षाच्या माध्यमातून ४५ तक्रारी आल्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अतिक्रमण, रस्ते, तसेच कचरा अशा तक्रारींचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होता.

दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध तक्रारी घेऊन अनेक नागरिक महापालिका भवनामध्ये येत असतात. विभागप्रमुख दाद देत नसल्याने अनेक नागरिकांना थेट महापालिका आयुक्तांना भेटायचे असते. सोमवार आणि गुरुवार या आयुक्तांच्या भेटीच्या दिवशी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी असते. त्यामुळे काहींना आयुक्तांच्या भेटीविनाच परतावे लागते. आयुक्तांची भेट न झाल्याने आपली समस्या ऐकून घेतली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.

यामध्ये महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्त सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. या तक्रारींवर आवश्यक तो अभिप्राय लिहून अतिरिक्त आयुक्त संबंधित विभागाकडे पाठविणार आहेत. गुरुवारी या कक्षाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४५ तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी या तक्रारी ऐकून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अनधिकृत बांधकामांविषयीच्या होत्या. याशिवाय, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित असल्याचे चंद्रन यांनी सांगितले.

प्रेक्षक कक्षाचे रूपांतर तक्रार निवारण कक्षात

महापालिका भवनामधील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहातील (जीबी हॉल) प्रेक्षक कक्षाचे रूपांतर तक्रार निवारण कक्षात करण्यात आले आहे. येथे १८० नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त या कक्षात बसून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देतील. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला आहे.