लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मिळकतकर वसुलीसाठी पुणे महापालिकेने ‘दामिनी पथके’ तयार केली आहेत. या पथकांची मदत घेऊन अधिकाधिक मिळकतकर वसूल करण्याचा निर्धार विभागाने केला आहे. १२ दामिनी पथके तयार केली असून, प्रत्येक पथकामध्ये पाच महिलांचा समावेश असणार आहे. महापालिकेने प्रथमच अशी पथके तयार केली आहेत.

पुणे महापालिकेची विविध थकबाकीदारांकडे सुमारे ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये अनेक मोठ्या आणि नामांकित व्यावसायिकांचा समावेश असून, काही शिक्षण संस्थांनीदेखील महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर थकविला आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी सर्वसाधारण २१०० कोटींचे उद्दिष्ट गाठण्यास मिळकतकर विभागाला यश आले आहे. यामध्ये अधिक वाढ कशी होईल, याासाठी मिळकतकर विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी बँड पथक तयार केले होते. त्या माध्यमातून संबंधित थकबाकीदाराला नोटीस बजावून ठराविक दिवसांत थकबाकी भरण्यास सांगितले जाते. महापालिकेने दिलेल्या मुदतीनंतरही थकबाकी न भरल्यास त्या थकबाकीदाराच्या मिळकतीसमोर तसेच त्याच्या घरासमोर महापालिकेचे बँड पथक जाऊन बँड वाजविते. यामधून देखील अनेक थकबाकीदारांची वसुली झालेली आहे.

थकबाकी न भरणाऱ्या मिळकती सील करून त्यानंतर त्यावर जप्तीची नोटीस लावून प्रसंगी थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांचा लिलावदेखील महापालिकेकडून केला जातो. यंदा दोन वेळा महापालिकेच्या वतीने हा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

आर्थिक वर्षे संपण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. उत्पन्नाचा टप्पा गाठण्यासाठी अधिकाधिक मिळकतकराची वसुली होणे आवश्यक आहे. त्यामुळे मिळकतकर विभागाने १२ दामिनी पथके तयार केली आहेत. त्या माध्यमातून थकबाकी असलेल्या मिळकतींची पाहणी करून वसुली केली जात आहे. या पथकांना चांगला प्रतिसाद मिळत असून, दहा लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच, तीन मिळकती जप्त करण्यात आल्याचे मिळकतकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी दामिनी पथके तयार केली आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी पथके प्रथमच तयार करण्यात आली आहेत. मार्च अखेरपर्यंत अधिकाधिक थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न आहे.