लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात राबविण्यात येत असलेल्या नदीसुधार योजनेला यश मिळावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. शहरातील नाल्यांच्या बाजूने टाकण्यात आलेल्या ड्रेनेजलाइनचे पाणी फुटलेल्या चेंबरमधून नाल्यातून नदीत जाऊ नये. तसेच या ड्रेनेजलाइन कायम वाहत्या राहाव्यात यासाठी महापालिकेने विशेष कार्यपद्धती अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांची शुक्रवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने नाल्यांच्या बाजूने वाहणाऱ्या ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीचा विषय, तसेच शहरातील ड्रेनेज लाइनवरील चेंबरची नियमित सफाईचे नियोजन करणे यावर भर देण्यात आला.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत पेच कायम; मैत्रीपूर्ण लढत…
शहरातील नाल्यामधील ड्रेनेज लाईनचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये काही भागातील चेंबर फोडल्याचे लक्षात आले. त्यामुळे मैलापाणी पुन्हा नाल्यातून नदीमध्ये जाते. या पार्श्वभूमीवर नाल्यांमधील ड्रेनेज लाइन आणि चेंबरचीही विशिष्ट पद्धतीने दुरुस्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील मोठ्या ड्रेनेज लाइन, तसेच सातत्याने तुंबणाऱ्या ड्रेनेज लाइन व चेंबरची नियमित सफाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
आणखी वाचा-लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
शहरात निर्माण होणाऱ्या सर्व मैलापाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडण्यासाठी नदीसुधार योजना राबविण्यात येणार आहे. नाल्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेजलाइनचे पाणी नाल्यात जाऊ नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. -पृथ्वीराज बी. पी. , अतिरिक्त महापालिका आयुक्त
© The Indian Express (P) Ltd