पुणे : हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णीची वाढ झाली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होऊन साथरोगांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला जलपर्णी काढण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र, बेबी कॅनॉल हा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पर्यावरण विभागाने हात झटकले आहेत. आरोग्य विभागानेच थेट पाटबंधारे विभागाला पत्र लिहावे, अशी भूमिका पर्यावरण विभागाने घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बेबी कॅनॉल आहे. हा बेबी कॅनॉल साडेसतरा नळी, अन्सारी फाटा, महादेवनगर, घुले वस्ती, कल्पतरू सोसायटी, अमर सृष्टी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, मांजरी, फुरसुंगी, शेवाळवाडी आणि सायकरवाडी या परिसरातून जातो. या बेबी कॅनॉलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे डासोत्पत्ती वाढल्याने आरोग्य विभागाकडे सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याचबरोबर डासोत्पत्ती वाढल्याने साथरोगांचा धोकाही वाढला आहे.

हेही वाचा >>>नव्या टपाल कार्यालयाचे उद्घाटन; बावधन आता पुणे ४११०७१

आरोग्य विभागाने नागरिकांच्या तक्रारीनुसार कीटकनाशक औषधाची फवारणी बेबी कॅनॉलमध्ये सुरू केली. मात्र, जलपर्णीमुळे औषधफवारणीचा फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला पत्र पाठविले. या पत्रात बेबी कॅनॉलमधील जलपर्णी काढावी, अशी मागणी करण्यात आली. जलपर्णीमुळे डासोत्पत्ती वाढल्याने आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे, असेही पत्रात नमूद केले. यावर पर्यावरण विभागाने बेबी कॅनॉल आपल्या कार्यकक्षेत नसून, पाटबंधारे विभागाकडे असल्याची भूमिका घेतली आहे. आरोग्य विभागाने आम्हाला पत्र पाठविण्याऐवजी थेट पाटबंधारे विभागाला पत्र पाठवावे, अशी भूमिका पर्यावरण विभागाने आता घेतली आहे.

हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी असून, त्यामुळे डासोत्पत्ती वाढली आहे. यातून साथरोगांचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर तेथील स्थानिक नागरिकांकडूनही वारंवार डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रारी येत आहेत.- डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हडपसर परिसरातील बेबी कॅनॉल हा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहे. आरोग्य विभागाने आमच्याकडे या बेबी कॅनॉलमधील जलपर्णी काढण्याबाबत मागणी केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी थेट पाटबंधारे विभागाला पत्र लिहून ही मागणी करायला हवी.- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation health and environment departments point fingers at each other regarding waterparni pune print news stj 05 amy