सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना रस्त्यांची, चौकांची, महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळण्यासाठी महापालिकेकडून शहरात हजारो दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने या फलकांकडे केलेल्या पूर्ण दुर्लक्षामुळे या फलकांवरून नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे हे फलक म्हणजे फुकटात जाहिरात करण्याची हक्काची ठिकाणे झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने अनेक दिशादर्शक फलक लावतानाच चुकीच्या पद्धतीने लावले आहेत. काही फलक पादचाऱ्यांना अडथळे ठरत आहेत. काही दिशादर्शक रस्ते दुभाजकांवरील झाडांमुळे दिसत नाहीत, तर काही दिशादर्शक फलक तुटलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत. कमानींवरील दिशादर्शकांवर प्रामुख्याने राजकीय फ्लेक्स लावले जात असून आणि राजकारणी, मंत्री, धनदांडग्यांच्या वाढदिवसानिमित्तचे फ्लेक्सही या फलकांवर सातत्याने लावले जात आहेत. दिशादर्शक फलकांवरील निम्म्या भागात अधिकृतपणे म्हणजे शुल्क भरून जाहिरात करण्याची सोय आहे. त्या माध्यमातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, निम्म्याच भागात जाहिरात लावण्याला परवानगी असताना पूर्ण दिशादर्शकावरच जाहिराती लावल्या जातात. असे प्रकार सर्रासपणे होत असताना प्रशासनाकडून मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. केंद्रीय नेते, राज्यातील मंत्री आणि राजकीय पक्षांच्या बडय़ा नेत्यांचा शहरात दौरा असेल तर फ्लेक्स लावण्यासाठी दिशादर्शकांचीच निवड केली जाते.

अनेक चौकांमध्ये ज्या पाटय़ा महापालिकेने बसवल्या आहेत, त्यांच्यावरही बिनदिक्कतपणे जाहिराती चिकटवल्या जात असल्या तरी त्या काढण्याची आणि अशा जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणतीही प्रक्रिया महापालिका करत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

 

दिशादर्शक कमानींवर अनधिकृतरीत्या लावलेल्या जाहिरातींवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून कारवाई केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून त्याबाबतची छायचित्रे प्रसिद्ध केली जातात. याबाबत आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयीन खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

– विजय दहिभाते, आकाशचिन्ह आणि परवाना विभागप्रमुख

प्रथमेश गोडबोले

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation ignored indication board