पाणी आणि पुणेकरांचे नाते किती जिव्हाळ्याचे आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गेल्या ११ महिन्यांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना सोमवारपासून पुन्हा एकदा रोजच्या रोज पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या आठवड्यातच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत पुण्याला रोज दिवसातून एकदा पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे सोमवारपासून ‘गुगल’ या सर्च इंजिनवर नेटिझन्सकडून पीएमसी, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशन हे शब्द वापरून सर्वाधिक सर्च करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी सकाळी देशातील टॉप ट्रेंडिंग विषयांमध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा विषय दिसू लागला. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांतील विषय ट्रेंडिंगमध्ये येण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. पण पुण्यातील विषय देशातील ट्रेंडिंगमध्ये येण्याचा प्रकार सातत्याने दिसत नाही. या वरूनच पुणेकरांसाठी पाणी किती जिव्हाळ्याचे आहे, हे दिसून आले.
गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये कमी पाणी जमा झाले होते. त्यामुळे सप्टेंबर २०१५ पासून पुणे शहरात एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. यंदा जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांत जोरदार पाऊस झाल्यामुळे खडकवासला प्रकल्पामध्ये आतापर्यंत २७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे पुण्यातील पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी महापालिकेमध्ये सातत्याने लावून धरली होती. या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये पाणीकपात मागे घेण्याची निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून शहरातील सर्व भागांमध्ये दिवसातून एकदा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक पाहण्यासाठी पुणेकरांनी ‘गुगल’चा सहारा घेतल्याचे यावरून दिसून येते आहे.