पुणे : महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) मिळकतकरातून २ हजार २२९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये समाविष्ट गावांमधून ४१४.०९ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून मंगळवारी (२५ मार्च) एकाच दिवशी सर्वाधिक १३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नापैकी मुख्य स्त्रोत आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल २०२३ ते २५ मार्च २०२४ या काला‌धीत २ हजार १३६ कोटी ८ लाख २४ हजार ६३४ कोटींचे उत्पन्न कर आकारणी आणि करसंकलन विभागाला मिळाले होते. तर चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२५ पर्यंत २ हजार २२९ कोटी ९ लाख ५१ हजार १९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकर जमा करण्यासाठी शेवटचे पाच दिवस राहिले असल्याने सुमारे चारशे कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधून महापालिकेला ४१४.०९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. फुरसुंगी आणि ऊरूळी देवाची या दोन गावांमधील मिळकतधारकांनी ३५.२२ कोटी रुपये जमा केले आहेत. या दोन्ही गावांसह समाविष्ट ३४ गावांमधून ४४९.३२ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. दरम्यान, मिळकतकराच्या उद्दीष्टपूर्तीसाठी थकबाकी वसुलीला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी स्वतंत्र वसुली पथकांची स्थापना करण्यात आली असून मिळकतकराची वसुली सुरू करण्यात आली आहे. मिळकतकर थकबाकीदारांसाठी महापालिका कोणतीही अभय योजना राबविणार नसल्याने मिळकतकर तातडीने जमा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

मिळकतकर देयकावर चाळीस टक्क्यांच्या सवलतीचा उल्लेख करण्याची मागणी

मिळकतकरामधील चाळीस टक्के सवलतीवरून गेल्या वर्षी मोठा गोंधळ झाला होता. ही सवलत आहे की नाही, हे मिळकतकराच्या देयकावरून समजून येत नाही. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही देयकावरून सवलत मिळाली आहे की नाही, हे सांगता येत नाही. सवलत मिळाली की नाही हे महापालिकेच्या संगणक प्रणालीतून शोधावे लागत आहे. आगामी आर्थिक वर्षासाठीची (२०२५-२६) मिळकतकराची देयकांचे वाटप एक एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. देयके तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात देयकावर चाळीस टक्क्यांच्या सवलतीचा ठळक उल्लेख करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.