पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या भागात पुणे महापालिकेच्या वतीने शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी दिले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणातून पाणी उचलून ते एका विहिरीत सोडले जाते. त्यानंतर हे पाणी नागरिकांना पुरविले जाते. या पाण्याची तपासणी केली जाणार असून, त्यानंतर या रुग्णांची संख्या खराब पाण्यामुळे वाढत आहे का, हे स्पष्ट होणार आहे.
पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. यातील पाच रुग्ण हे पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. याचबरोबर पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. खडकवासला भागाजवळ असलेल्या डीएसके विश्व, नांदोशी, किरकिटवाडी, नांदेड या भागातील नागरिकांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे. हा भाग महापालिकेच्या हद्दीत असला, तरी या भागातील नागरिकांना माहपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी दिले जात नाही. ज्या भागात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. तेथे शुद्धीकरण केेलेले पाणी न देता एका विहिरीमध्ये पाणी सोडले जाते. या विहिरीतून या चार भागांना पाणी दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा >>>पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळताच राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल
शुद्धीकरण न केलेले पाणी प्यायल्याने रुग्णांना हा त्रास होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या विहिरीतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्याच्या आजूबाजूच्या सांडपाणी वाहिनीचे पाणीदेखील यात मिसळण्याची शक्यता असल्याने त्याचीही तपासणी महापालिकेच्या वतीने केली जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ज्या परिसरातील नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली आहेत. तेथील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, त्याची तपासणी केली जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर हा आजार नक्की कशामुळे झाला, याचे कारण समोर येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेकडून अडीच कोटींचा अपहार; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचे संशयित रुग्ण सापडलेल्या भागाची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार तेथील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करताना ब्लिचिंग पावडरचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या विहिरीतून या भागाला पाणी दिले जाते तेथील सांडपाण्याच्या वाहिन्यांची तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराची लक्षणे आढळत आहेत. हाताला मुंग्या येणे, ताकद कमी होणे ही लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. अशुद्ध पाण्यामुळे हा आजार होतो असे काही नाही. ज्या परिसरात या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळले आहेत. तेथील पाण्याची तपासणी केली जात आहे. हा आजार नक्की कशामुळे होतो, याचा तपास करण्यासाठी तपासण्या केल्या जात आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.