पुणे : हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णीची वाढ झाली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होऊन साथरोगांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने जलसंपदा विभागाला जलपर्णी काढण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, बेबी कॅनॉलमधील जलपर्णी आणि कचरा हा महापालिकेमुळे झाला असल्याने त्यांनीच तो स्वच्छ करावा, अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. यामुळे जलपर्णी काढायची कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बेबी कॅनॉल आहे. हा बेबी कॅनॉल साडेसतरा नळी, अन्सारी फाटा, महादेवनगर, घुले वस्ती, कल्पतरू सोसायटी, अमर सृष्टी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, मांजरी, फुरसुंगी, शेवाळवाडी आणि सायकरवाडी या परिसरातून जातो. या कॅनॉलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. कचराही मोठ्या प्रमाणात साचला आहे. जलपर्णीमुळे परिसरात डास वाढल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे सातत्याने येत आहेत. साथरोगांचा धोकाही त्यामुळे वाढला आहे.

आरोग्य विभागाने कीटकनाशक औषधांची फवारणी बेबी कॅनॉलमध्ये सुरू केली. मात्र, जलपर्णीमुळे औषधफवारणीचा फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जलसंपदा विभागाला २ जानेवारी रोजी पत्र पाठविले. त्यात बेबी कॅनॉलमधील जलपर्णी काढावी, अशी मागणी करण्यात आली. यावर जलसंपदा विभागाने कॅनॉलमधील जलपर्णी न काढण्याची भूमिका घेतली आहे.

जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र लिहिले असून, त्यात तेथील वस्तुस्थितीदर्शक अहवाल मांडला आहे. त्यात म्हटले आहे की, कॅनॉलच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामध्ये जास्त प्रमाण झोपड्यांचे आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा कॅनॉलमध्ये टाकला जात आहे. त्यामुळे त्यात घाणीचे प्रमाण मोठे आहे. कॅनॉलच्या दोन्ही बाजूंनी यापूर्वी केलेली संरक्षण जाळीही नागरिकांनी तोडली आहे. जलसंपदा विभागाकडे कॅनॉल स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रे उपलब्ध नाहीत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाचे नियोजन नसल्याने कालवा कायमस्वरूपी सुस्थितीत आणि स्वच्छ ठेवणे शक्य नाही.

हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी असून, त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. यातून साथरोगांचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर तेथील नागरिकांकडूनही वारंवार डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रारी येत आहेत. जलसंपदा विभागाला दोन महिन्यांपूर्वी पत्र पाठवूनही कार्यवाही झालेली नाही.

डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

बेबी कॅनॉलमध्ये कचरा टाकला जाऊ नये, यासाठी पुणे महापालिकेने उपाययोजना करायला हव्यात. त्या परिसरात कचराकुंड्या ठेवल्यास कचरा कॅनॉलमध्ये टाकला जाणार नाही. याचबरोबर महापालिकेने कॅनॉलच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळी बसविण्यासाठी कार्यवाही करायला हवी. कॅनॉलची स्वच्छता आणि सुरक्षेची कार्यवाही महापालिकेनेच करावी.

श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Story img Loader