पुणे : महिलांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या ११ ‘ती बस’ मोबाईल टॉयलेटपैकी सध्या तीनच बस वापरात आहेत. ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचा विचार महापालिकेच्या घनकचरा विभागाने सुरू केला आहे. यासाठी पाच वर्षांसाठी या बसची देखभाल दुरुस्तीची निविदा काढण्यात आली आहे. या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहर स्वच्छ अभियानातंर्गत २०१९ मध्ये महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील गर्दीच्या विविध अकरा ठिकाणी पीएमपीएमएलच्या जुन्या बसेसचा वापर करून महिलांसाठी ‘ती बस’ मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात आली होती. यापैकी सध्या केवळ तीनच बसचा वापर सुरू आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने हा उपक्रम राबविला आहे. महापालिकेकडून दिली जाणारी ही सेवा आतापर्यंत मोफत होती. परंतु आता ही सेवा सुरू करताना त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
महापालिकेने पीएमपीच्या सेवेतून बाद झालेल्या बसचा वापर महिलांसाठी मोबाईल टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय घेतला होता. गर्दीच्या ११ ठिकाणी प्रत्येकी चार सीटची सुविधा असलेल्या या बस ठेवण्यात आल्या होत्या. पाण्याची आणि ड्रेनेजची सुविधा उपलब्ध होईल, अशा ठिकाणी या बस उभ्या करण्यात आल्या होत्या. सीएसआरच्या माध्यमातून या बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती. परंतु, नंतर टप्प्याटप्प्याने ११ पैकी ८ बसची सेवा बंद करून त्या हलविण्यात आल्या. सध्या जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानाच्या आवारात, शनिवारवाडा आणि जिल्हा न्यायालयाजवळ या तीन बसचा वापर मोबाईट टॉयलेटसाठी सुरू आहे.
निधीअभावी बंद पडलेल्या या बस पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने हालचाल सुरू केली आहे. यासाठी पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संस्थेला या बदल्यात संबंधित बसवर जाहिरातीचे अधिकार तसेच बसमध्येच एकाबाजूला पॅकेज फूड विक्रीचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.