पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत फिरती स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचे जाहीर करणाऱ्या महापालिकेने पुरविलेली फिरती स्वच्छतागृहेच अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतागृहात पाणी आणि वीज अशा मूलभूत बाबींचीही वानवा असून, काही स्वच्छतागृहांच्या दरवाज्यांना कडी नसल्याने ते वापराविना पडून असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे.
या सुविधेच्या अभावामुळे शहरातील अस्वच्छतेमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. किती लोकसंख्येच्या मागे किती स्वच्छतागृह असावीत, ती किती अंतरावर असावीत, याचे काही निकष निश्चित आहेत. प्रति साठ व्यक्तींमागे एक स्वच्छतागृह असावे, असा निकष असताना शहरात सध्या प्रती २३३ व्यक्तींमागे एक स्वच्छतागृह असून दोन ते अडीच किलोमीटर अंतराचे निकषही पूर्ण नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या स्वच्छतागृहांची कमतरता मोठी असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठीची स्वच्छतागृह ४० टक्क्यांनी कमी आहेत.
हेही वाचा : पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या संख्येमुळे दरवर्षी महापालिकेकडून उत्सवाच्या कालावधीत फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार शहरातील अस्तित्वातील स्वच्छतागृहांची सर्व माहिती उपयोजनावर देण्याबरोबरच ४०० फिरती स्वच्छतागृहे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शहराच्या विविध भागात ही सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, कोथरूडमधील फिरती स्वच्छतागृहे कागदावरच असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केला आहे.
हेही वाचा : गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा; विक्रेत्याला वर्गणीसाठी धमकी
‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून काही स्वच्छतागृहांची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका खासगी कंपनीकडून ती उपलब्ध करून देण्यात आली असून, ती सध्या तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ती बंद असल्याच्या तक्रारीत तथ्य नाही. उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत या सुविधेचा वापर करता येणार असून, मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. दरम्यान, महापालिकेच्या फिरत्या स्वच्छतागृहांबाबत कोणतीही तक्रार नाही’, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : पुणे : महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा
‘कोथरूडमधील डहाणूकर काॅलनी परिसरात महापालिकेच्या वतीने काही फिरती स्वच्छतागृहे ठेवण्यात आली आहेत. मात्र, त्याचा वापर होत नसून स्वच्छतागृहात वीज, पाणी अशा सुविधा नाहीत. काही स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ती तशीच पडून आहेत. काही स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत, तर काही दरवाज्यांना कड्या नसल्याचेही निदर्शनास आले आहे’, असे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी म्हटले आहे.