पुणे : शहरात संकटलीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावर उपाययोजन करणे शक्य व्हावे, यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने संकट व्यवस्थापन कक्ष उभारला जाणार आहे. यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असणार आहेत. साडेसात हजार चौरस फूट जागेत हा कक्ष असणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका आणि पोलिसांनी शहरभर लावलेले सीसीटीव्ही या कक्षाला जोडले जाणार असल्याने दुर्घटनांवर लक्ष असणार आहे. त्यामुळे दुर्घटनेनंतर तातडीने मदत देणे शक्य होणार आहे.
महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि भवन रचना विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी ही माहिती दिली. पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात होत असून, शहरीकरणामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूरजन्य स्थिती शहरात निर्माण होते. तसेच काही वेगवेगळ्या दुर्घटनाही शहरात घडत असतात. अशी काही स्थिती निर्माण झाल्यानंतर तातडीने मदत देता यावी, या हेतूने महापालिकेने हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा कक्ष उभारण्यात येत आहे. पुढील चार महिन्यांत मे २०२५ पर्यंत या कक्षाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
हेही वाचा – काँग्रेस भवनला ‘जाग’ येणार कधी?
या कक्षासाठी ६० ते ७० कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाणार आहे. पावसाळ्यामध्ये येथील कर्मचाऱ्यांची कक्षातच राहण्याची व्यवस्था असणार आहे. शहरातील महापालिका तसेच पोलिसांनी लावलेले सर्व सीसीटीव्ही या कक्षाला जोडले जाणार आहेत. यामुळे दुर्घटनांवर लक्ष ठेवले जाणार असून, दुर्घटनेनंतर तातडीने आवश्यक मदत देणे शक्य होणार आहे. संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. त्यांना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विशेष आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे शहर अभियंता वाघमारे यांनी सांगितले.
हेही वाचा – लाखांमध्ये एका व्यक्तीला होणाऱ्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात! नेमका काय आहे हा आजार…
कक्षासाठी अन्य कार्यालयांंचे होणार स्थलांतरण
महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पश्चिम बाजूचा ( मेट्रो स्थानकाच्या बाजूचा) पूर्ण मजला या कक्षासाठी दिला जाणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या या मजल्यावर मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्त ( विशेष), झोपडपट्टी पुनर्वसन आणि निर्मूलन, स्वच्छ सर्वेक्षण अभियान विभाग, बांधकाम विभाग तसेच विधी विभागाची भांडार रूम आहे. या कार्यालयाचे स्थलांतर सावरकर भवन येथील महापालिकेच्या जागेत केले जाणार आहे.