पिंपरी : शहरातील वाहतूक सोडवण्यासाठी मुंबई-पुणे लोहमार्गावर पिंपरीतील डेअरी फार्म येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. मार्चअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुलाच्या कामाचा आदेश मार्च २०२३ मध्ये देण्यात आला होता. पुलाच्या उभारणीस अडथळा ठरणारी १४२ झाडे काढण्यात आली. त्याचे मूल्य संरक्षण विभागाकडे जमा केले. संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६४ झाडांचे पुनर्रोपण संरक्षण विभागाच्या हद्दीतच करण्यात आले. हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न आहे. रेल्वे विभागातील विविध विभागांशी समन्वय साधून सर्व विभागांची मान्यता मिळाल्यानंतर या पुलाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. महापालिकेशी संबंधित पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के राहिलेले काम रेल्वे विभागाशी संबंधित आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर लोहमार्ग फाटकासमोर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

हेही वाचा…पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

वेळेची बचत

लोहमार्गावर पूल उभारल्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील डेअरी फार्म, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी गावातील नागरिकांचा वळसा घालावा लागणार नाही.

उड्डाणपुलाचे फायदे

लोहमार्गावरील फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी सुटेल

पिंपरी कॅम्प व चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल

पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी गावातील नागरिकांना पुणे- मुंबई रस्त्याला पोहोचण्यासाठी जवळचा पर्याय उपलब्ध होईल

संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाला कमी वेळेत पोहचणे शक्य होईल

हेही वाचा…वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त

नागरिकांच्या सुविधांचा विचार करून उड्डाणपुलाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. पुलाचे काम वेळेत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या प्रकल्पामुळे पिंपरीतील वाहतुकीची समस्या सुटेल. परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी येथील नागरिकांना संत तुकाराम मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे होईल, असे अतिरिक्त आयुक्त
विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation plans to open pimpri flyover on mumbai pune railway by march pune print news ggy 03 sud 02