पुणे : मुसळधार पावसाने शहर खड्ड्यांमध्ये गेले असताना, आता शहरात कोठे खड्डे पडले आहेत, याच्या तक्रारी महापालिकेकडे करता येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने विशेष दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. त्या ठिकाणी नागरिकांना खड्ड्यांची माहिती देण्याबरोबरच तक्रारी करता येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, तीन दिवसांत प्रमुख रस्त्यांवरील १ हजार २२४ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच १५३ खड्ड्यांमध्ये ‘पॅचवर्क’ करण्यात आले आहे. ज्या रस्त्यांवर जास्त खड्डे आहेत, अशा रस्त्यांची ‘रीसरफेसिंग’ची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेला पुन्हा काही कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

हेही वाचा : पुण्यासाठी २१.४८ टीएमसी पाणी कोट्याची मागणी, महापालिकेकडून जलसंपदा विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर

शहरात झालेल्या सततच्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. रस्त्यांची चाळण झाल्यानंतर महापालिका प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली होती. महापालिकेचे विविध विभाग, शासकीय आणि निमशासकीय संस्थांकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर खोदाईची कामे करण्यात आली. या कामांमुळे आणि सततच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली होती. त्यातही डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून आले होते.

मात्र, पावसाने उघडीप न घेतल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे शनिवारपासून रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यावर करायचे ‘पॅचवर्क’ या दोन्ही कामांवर महापालिकेच्या पथ विभागाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. सिमेंटचा वापर करून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, ‘पॅचवर्क’साठीही सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. तसेच अनेक खड्डे आणि ‘पॅचवर्क’ डांबरी मालाच्या साहाय्याने बुजविण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

हेही वाचा : पुणे: नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मासिक सभा बंधनकारक, अतिरिक्त आयुक्तांचा आदेश

तीन दिवसांत बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची संख्या- १२२४

‘पॅचवर्क’ करण्यात आलेल्या खड्ड्यांची संख्या- १५३

सिमेंटचा वापर- ३६३ क्युबिक मीटर

डांबरी मालाचा वापर- २५६.५ टन

खड्ड्यांची माहिती देण्याचे आवाहन

नागरिकांकडून खड्ड्यांसंदर्भात पथ विभागाला माहिती कळविण्यात आल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने विशेष दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. ०२०- २५५०१०८३ किंवा ९०४३२७१००३ या दूरध्वनी क्रमांकांवर नागरिकांना खड्ड्यांची माहिती आणि तक्रार करता येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation potholes complaint helpline number pune print news apk 13 css