पुणे : पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील (२०२४-२५) मिळकत करातून दोन हजार ३५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १०० कोटी रुपयांनी वाढ झाली असली, तरी उद्दिष्टपूर्ती साध्य करता आलेली नाही. मिळकतकराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून, अखेरच्या दहा दिवसांत १७० कोटी रुपये मिळाले आहेत.
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नापैकी मुख्य स्त्रोत आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल २०२३ ते २५ मार्च २०२४ या कालावधीत दोन हजार १३६ कोटी ८ लाख २४ हजार ६३४ कोटींचे उत्पन्न कर आकारणी आणि करसंकलन विभागाला मिळाले होते, तर चालू आर्थिक वर्षासाठी दोन हजार ७७० कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, या आर्थिक वर्षात राज्य शासनाने समाविष्ट गावातील थकबाकीला स्थगिती दिली. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळल्याने मिळकतकरावर परिणाम झाला. तसेच, ४० टक्के कर सवलत, भोगवटा पत्र मिळाल्यानंतर त्या मिळकतींच्या करआकारणीला विलंब, त्यानंतर दुरुस्ती आदी कारणांमुळे उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यास महापालिकेला अपयश आले आहे.
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधून महापालिकेला ४१४.०९ कोटी रुपयांचा निधी मिळाला. फुरसुंगी आणि ऊरूळी देवाची या दोन गावांमधील मिळकतधारकांनी ३५.२२ कोटी रुपये जमा केले. या दोन्ही गावांसह समाविष्ट ३४ गावांमधून ४४९.३२ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले. दरम्यान, मिळकतकराच्या उद्दीष्टपूर्तीसाठी थकबाकी वसुलीला महापालिकेने प्राधान्य दिले होते. त्यासाठी स्वतंत्र वसुली पथकांची स्थापना करण्यात आली, महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी बँड पथक, महिला कर्मचाऱ्यांचे पथक, मिळकत जप्तीसारख्या नियमित उपाययोजना केल्या. मिळकतकराची वसुली सुरू करण्यात आली.
मिळकतकर थकबाकीदारांसाठी महापालिका कोणतीही अभय योजना राबविणार नसल्याने मिळकतकर तातडीने जमा करावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. मात्र, मिळकतकर विभागाला उद्दिष्टपूर्ती साध्य करता आली नाही, हे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी मिळकतकर विभागाला दोन हजार २४९ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.