पुणे : एरवी शंभर-दोनशे रुपयांच्या घरात पाणीबिल भरणाऱ्या शनिवार पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला पुणे महापालिकेने चक्क पावणेअकरा लाख रुपयांचे पाणीवापराचे बिल पाठविले आहे. मोबाइल क्रमांकावर आलेल्या या चुकीच्या बिलामुळे ७५ वर्षांच्या या ज्येष्ठ नागरिकाची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे रक्तदाब वाढल्याची तक्रार त्यांनी केली असून, त्यांनी महापालिकेकडे याबाबत विचारणा केली असता, महापालिकेने केवळ ‘बघू’ असे मोघम उत्तर दिले.

गोविंद गोरे (वय ७५) असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गोरे शनिवार पेठेत राहतात. त्यांना महापालिकेकडून मीटरने पाणीपुरवठा केला जातो. दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर महापालिकेचे पाण्याचे बिल थकीत असल्याचा मेसेज आला. त्यांच्याकडे १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल थकीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.

गोरे यांना आलेल्या बिलामध्ये मोबाइल क्रमांक त्यांचा असला, तरी प्रत्यक्षात नाव मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे आहे. या बिलावरील पत्ता त्यांच्या जवळच्या भागातील आहे. या चुकीच्या बिलाबद्दल गोरे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेऊन त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद महापालिकेने दिला नाही.

या बिलाची बारकाईने तपासणी केली असता, बिलावर असलेला ग्राहक क्रमांक आपला नसल्याचे गोरे यांच्या लक्षात आले. पण, हे बिल काढताना त्यांचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आल्याने बिलाची थकबाकी त्यांच्याच क्रमांकावर दाखविण्यात आली आहे. या बिलावर ‘शनिवार पेठ, नवा पूल’ असा पत्ता आहे, तर गोरे यांचा पत्ता ‘बावडेकर टेकडी, शनिवार पेठ’ असा आहे.

‘बिल आल्यानंतर बिलाशी जोडलेला मोबाइल क्रमांक काढून टाकावा, यासाठी दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा विभागात हेलपाटे घातले. मात्र, केवळ ‘बघू’ असे उत्तर देण्यात आले,’ अशी तक्रार गोविंद गोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.दरम्यान, या प्रकाराबाबत महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

तक्रारदार गोरे म्हणाले, महापालिकेची पाणीपट्टी नियमितपणे भरल्यानंतरही १० लाख ७६ हजार रुपयांची पाणीपट्टी थकविल्याचा मेसेज आला. ही थकबाकीची रक्कम बघून माझा रक्तदाब वाढला. माझा मोबाइल क्रमांक दुसऱ्यांच्या बिलावर कसा टाकण्यात आला? तक्रार करूनही पाणीपुरवठा विभागाने तातडीने माझा क्रमांक काढून का टाकला नाही?

Story img Loader