पुणे : शहरातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या योजनेची वार्षिक एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख ६० हजार एवढी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून मुख्य सभेच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्यता योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर योजनेच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचे नियोजित होते. यापूर्वी शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक होते. मात्र योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आणि बोगस लाभार्थ्यांचे अर्ज येत असल्याने वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार तसा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. त्यामुळे यापुढे आता १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तिदान, निर्माल्य संकलनासाठी रथ; विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक

दरम्यान, राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या धर्तीवर या योजनेची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. राज्याच्या आरोग्य योजनेत लाभ मिळाला नाही तरच शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार होणार आहेत. त्यासाठी शहरात परिमंडळ स्तरावर तीन केंद्र स्थापन करण्याचे नियोजित आहे. दरम्यान, स्थायी समितीने वार्षिक उत्पन्नात वाढ करण्यास मान्यता दिली असली तरी मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation shahri garib yojna income limit increased to 1 lakh 60 thousand rupees pune print news apk 13 css