पुणे : शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर विविध चौकांमध्ये लावण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक, बॅनर काढून टाकण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आठ दिवस राबविलेल्या मोहिमेमध्ये ७४० फलकांवर कारवाई करत ते काढून टाकण्यात आले आहेत. तसेच ९५ जणांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने मोहीम हाती घेत ही कारवाई केली.
शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक तसेच बॅनर्स लावण्यात आले आहेत. काही जाहिरात फलक मुख्य चौकात मोठ्या आकारात लावण्यात आल्याने वाहतूक नियंत्रण दिवे देखील झाकून गेले असल्याचे समोर आले होते. शहरात लावण्यात आलेल्या या बेकायदा जाहिरात फलकांमुळे शहर बकाल झाले होते. याप्रकरणी नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या आमदारांना शुभेच्छा देणारे फलक देखील अनेक चौकांमध्ये लावण्यात आले होते.
हेही वाचा…पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या या फलकांवर कारवाई केली जात नसल्याने आकाशचिन्ह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी यामध्ये लक्ष घालून अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर विशेष मोहीम राबवून आकाशचिन्ह विभागाने जाहिरात फलक, बॅनर काढून टाकले आहेत. यामध्ये ७४० जाहिरात फलक, बॅनर, काढण्यात आले असून, संबंधितांकडून ६ लाख ६७ हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या ९५ जणांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बेकायदा जाहिरात फलक, तसेच बॅनर, पोस्टर्स लावू नका, असे आवाहन महापालिकेने केले होते. महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास संबंधितांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २४४ आणि २४५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.
हेही वाचा…सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
अनधिकृत जाहिरात फलकांमध्ये दररोज वाढ होत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने आता यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पुढील काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरातील रस्त्यांवर बेकायदा फलक लावण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. आयुक्तांनी अनधिकृत फलक, बॅनर यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, पुढील काळातही कारवाई सुरूच राहणार आहे. प्रशांत ठोंबरे, उपायुक्त आकाशचिन्ह विभाग.
© The Indian Express (P) Ltd