पुणे : शहरातील मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध असलेल्या ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ असलेला पूल पाडण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. सर्व बाबींचा अभ्यास करून याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिका प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरापासून पुढे गेल्यानंतर शनिवार पेठेकडे जाताना जुने असे ओंकारेश्वर मंदिर आहे. नारायण पेठ तसेच डेक्कन परिसरातून नदीपात्रातून पुणे महानगरपालिकेकडे जाताना वाहन चालकांना ओंकारेश्वर मंदिरावरून जावे लागते. काही वर्षांपूर्वी नागरिकांना नदीच्या पलीकडे ये – जा करता यावी यासाठी ओंकारेश्वर ते वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल बांधण्यात आला आहे. हा नदीपात्रातील पूल पाडण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. हा पूल धोकादायक झाला असून, नदीपात्रातील पाण्याला अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याची तयारी पालिकेने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा…अनधिकृत ७४० जाहिरात फलक काढले अन् वसूल केला इतक्या लाखांचा दंड !

मुठा नदीपात्रात सुमारे ५५ वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक वाहने धुणे, मासे पकडणे, तसेच प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी पुलाचा वापर होत नाही. दर वर्षी पावसाळ्यात या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून, तो वापरासाठी सुरक्षित नाही. त्यावर वारंवार खड्डे पडतात.

या पुलाच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात पुलाच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चानंतर पुलाचे आयुर्मान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारा हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नदीकाठ विकसन प्रकल्पाबरोबरच पूरस्थितीच्या काळात होणार आहे.

हेही वाचा…पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…

पावसाळ्यात या पुलाच्या खांबाला कचरा, पाण्याबरोबर वाहून आलेली जलपर्णी अडकते. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. पूल पाडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाला होणारा अडथळा दूर होणार आहे.

दुरुस्तीसाठी लागणार ३९ लाख रुपये

या पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर इतकी आहे. हा पूल बांधल्यानंतर महापालिकेने शेजारीच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधले आहेत. या दोन्ही पुलांचा वापर होत असल्याने तसेच ३९ लाख रुपयांच्या खर्चानंतरही या पुलाचा वापर फारसा होणार नसल्याचे लक्षात आल्याने हा पूल पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रकल्प विभागाने तयार करून तो शहर सुधारणा समितीच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेऊन हे काम केले जाणार आहे.

Story img Loader