पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची तयारी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून परिमंडळनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच, शहरातील विविध भागांत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची रंगरंगोटी केली जात असून, स्पर्धा देखील घेतली जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत पुणे महानगरपालिकेने यापूर्वी अनेकदा भाग घेतला आहे. मात्र, पहिल्या पाच क्रमांकामध्ये महापालिकेला कधीही आपला क्रमांक पटकाविता आलेला नाही. या स्पर्धेतील क्रमवारी सुधारावी, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा…पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण
याचाच एक भाग म्हणून शहरातील स्वच्छतागृहांची स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. ‘पुणेे महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण शहरात ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांना सध्या ‘ऑफ व्हाइट’ (बदामी) तसेच हिरवा रंग दिला जात आहे. तसेच, स्वच्छतागृहांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती स्वच्छतागृहांची पाहणी करून स्वच्छतागृहांना गुण देणार आहे,’ असे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
केंद्र सरकारची स्वच्छतेची स्पर्धा जिंकायची असेल, तर महापालिका प्रशासनाला प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिमंडळनिहाय स्वच्छता मोहीम राबवून स्पर्धा घेण्याचे नियोजन केले आहे. पुणे शहरात पाच परिमंडळे आहेत. त्या सर्वांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेचा फायदा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी होणार आहे, असेही उपायुक्त कदम यांनी सांगितले.
हेही वाचा…पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी
केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियान स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकामध्ये पुणे शहराचे नाव यावे, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मागील वर्षीच्या स्पर्धेत पुणे शहराला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.