पुणे : शहरातील पथ विक्रेत्यांनी आपल्या पायावर उभे राहावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या ‘स्वनिधी से समृद्धी’ योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेने सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पुणे शहरातील पथ विक्रेत्यांच्या कुटुंबांचे महापालिकेकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. विक्रेत्यांच्या कुटुंबाकडून गोळा होणारी संपूर्ण माहिती ही संकेतस्थळावर भरली जाणार आहे. त्यामुळे या पुढील काळात एका क्लिकवर पथ विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आवश्यक असलेली सर्व माहिती महापालिका प्रशासनाला उपलब्ध होणार आहे.
पुणे महापालिका प्रशासनाकडून पीएम स्वनिधी योजना शहरात राबविण्यात येत आहे. ‘स्वनिधी से समृद्धी’ अंतर्गत यासाठी शहरातील पथक्रेत्यांच्या प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये व पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी महापालिकेने नेमलेले प्रतिनिधी जाऊन त्यांच्या कुटुंबांची माहिती पीएम स्वनिधीच्या पोर्टलवर भरणार आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील ज्या पथविक्रेत्याने स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, अद्याप कुटुंबाची माहिती दिलेली नाही. त्यांनी ही माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ही माहिती संकेतस्थळावर भरणे आवश्यक असून याचा फायदा येणाऱ्या काळात संबंधित पथ विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रातील ज्या पथ विक्रेत्यांनी अद्यापही आपल्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती दिलेली नाही, त्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील समाज विकास विभागातील समूहसंघटिका व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन देखील महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे.