पुणे : थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून थकबाकीदार मिळकतदारांच्या मिळकतींचे नळजोड तोडण्यात येणार असून, त्यासाठी परिमंडळनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून २ हजार ७२७ कोटी रुपयांच्या मिळकतकराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, मिळकतकराची थकबाकी सुमारे दहा हजार कोटींवर पोहोचली आहे. त्याशिवाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील मिळकतकर वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याने महापालिकेला या गावांमधून मिळणाऱ्या सुमारे ४०० ते ५०० कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : बंदोबस्तावरून घरी जाताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी शहरातील थकबाकीदारांच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २ डिसेंबरपासून थकीत मिळकतकर वसुलीवर भर देण्यात आला आहे. करवसुलीसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत थकबाकीदारांच्या घरासमोर बँडवादन केले जात आहे. तसेच थकबाकी असलेल्या निवासी, व्यावसायिक मिळकतींना दररोज भेट देऊन जप्तीची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत या पथकांनी ७१ कोटी ४१ लाख ८५ हजार ३९३ रुपयांचा थकीत कर वसूल केला आहे.

महापालिकेतर्फे एक एप्रिलपासून मिळकतकराची देयके पाठवली जातात. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने बाकी आहेत. मात्र, अद्यापही काही नागरिक, व्यावसायिकांनी मिळकतकर भरलेला नाही. त्यांचा नळजोड तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

मध्यवर्ती वसुली पथकासोबत एक प्लंबर, तीन बिगारी, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक यांच्या पथकाद्वारे थकबाकीदारांच्या मिळकतीचे नळजोड एक जानेवारीपासून तोडण्यात येतील. संपूर्ण थकबाकी भरल्यानंतरच नळजोड पूर्ववत केले जातील. त्यामुळे मिळकतधारकांनी थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation takes strict stand to recover outstanding income tax pune print news ccp 14 amy