पुणे : ‘शहरातील ज्या भागात महापालिकेने पाण्याचे मीटर बसविले आहेत. त्या नागरिकांकडून मीटरने पाणीपट्टी घ्यावी, असा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवावा,’ अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

शहरात गेल्या आठ वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मीटर लावले जात आहेत. शहरातील ज्या पाणीपुरवठा झोनमध्ये ९० टक्के मीटर बसविले आहेत, त्या भागात यंदापासून ही बिले दिली जाणार आहेत. तसेच, ज्यांना मीटरने पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्यांच्या मिळकतकरात आकारण्यात येणारी पाणीपट्टी रद्द केली जाणार आहे. ही पाणीपट्टी टेलिस्कोपिक दराने आकारली जाणार आहे. त्यामुळे अधिक वापर, अधिक बिल या तत्त्वावर आकारणी होईल. यामुळे शहरातील पाण्याचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत होणार आहे.

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरातील स्वतंत्र घरे, निवासी सोसायट्यांना पाणीमीटर बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे २ लाख ८२ हजार पाणीमीटर बसविण्यात येणार असून, त्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक पाण्याचे मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने शहरात १४१ झोन तयार केले आहेत. त्यांपैकी ४७ झोनचे काम पूर्ण झाले आहे. काही झोनमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून ९० टक्के पाणीमीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरद्वारे पाण्याची मोजणी केली असता, अनेक ठिकाणी प्रतिव्यक्ती ५०० ते ८०० लिटर प्रतिदिन वापर असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे निकषापेक्षा जास्त पाणीवापर होत असल्याने हा वापर कमी करण्यासाठी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यानुुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

मीटरद्वारे पाणीपट्टी आकारताना महापालिका १ हजार लिटर पाण्यासाठी साडेसात रुपये शुल्क आकारणार आहे. एखाद्या कुटुंबात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांनी दररोज पाणीवापराच्या निकषानुसार पाणी घेतल्यास केवळ साडेसात रुपयांचे पाणी बिल महापालिकेकडे भरावे लागणार आहे. मात्र, निकषापेक्षा जास्त पाणी घेतल्यास त्याचे जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत.

मोठ्या सोसायट्यांना फायदा

मोठ्या सोसायटीत एक हजार लोक राहत असतील, तर त्यांना पाणीवाटपाच्या नियमानुसार दररोज १ लाख ३५ हजार लिटर पाणी मिळेल. यासाठी १ हजार लिटरला साडेसात रुपये याप्रमाणे बिल आकारल्यास दिवसाला अवघे हजार ते अकराशे रुपये मोजावे लागतील. त्यामुळे मोठ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मीटरने पाणीपुरवठा फायद्याचा ठरणार असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे.