पुणे : चालू आर्थिक वर्षातील (२०२३-२४) मिळकतकर देयकांचे वितरण सोमवारपासून (१५ मे) करण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मिळकतधारकांना कर भरणा करता येणार असून कर भरणा करण्याची मुदत एक महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार येत्या ३१ जुलै पर्यंत मिळकतकर ऑनलाइन, धनादेश तसेच रोख स्वरूपात भरता येणार आहे. जुलै अखेरपर्यंत एकरकमी मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात किमान पाच ते कमाल दहा टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे.
हेही वाचा >>> बेकायदा गर्भपात करणाऱ्या डाॅक्टरसह तिघांवर गुन्हा
दरम्यान, १ एप्रिल २०१९ पासून करमूल्य निश्चित केलेल्या मिळकतधारकांचे अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपये महापालिकेकडे आहेत. त्यामुळे १५ मेपासून वितरित होणाऱ्या देयकांमध्ये १ एप्रिल २०१९ नंतरच्या मिळकतधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सुरू झाली आहे. त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. महापालिकेकडून निवासी मिळकतींना स्ववापरासाठी देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या निवासी आणि बिगरनिवासी मिळकतींना देखभाल-दुरुस्तीसाठी देण्यात येणारी १५ टक्के वजावट रद्द करून दहा टक्के वजावट देण्यात येणार आहे. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून करण्यात येणार आहे. अशा मिळकतींची देयके सोमवारपासून करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून पाठविली जाणार आहेत. मिळकतकर ३१ जुलैपर्यंत भरणाऱ्यांना सर्वसाधारण करामध्ये किमान पाच ते कमाल दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर मिळकतकर भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार असल्याचे महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून सांगण्यात आले.