पुणे : शालेय विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, अवकाश यांची माहिती सहज-सोप्या शब्दांत व्हावी, या उद्देशाने महापालिकेने सहकारनगरमधील ई-लर्निंग स्कूलमध्ये उभारलेले तारांगण पुन्हा सुरू होणार आहे. तब्बल चार वर्षांनी हे तारांगण सुरू होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अवकाश आणि तारे याबाबत माहिती मिळावी, म्हणून दोन कोटी रुपये खर्च करून महापालिकेकडून हे तारांगण उभारण्यात आले होते. मात्र, त्याची नियमित देखभाल-दुरुस्ती न झाल्याने ते गेल्या चार वर्षांपासून बंद पडले होते. आता हे तारांगण पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्यासाठी संस्था नेमण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

यासाठी ६१ लाख ६५ हजार ५०० रुपये खर्च येणार आहे. पाच वर्षांसाठी हा खर्च होणार आहे. हे तारांगण सुरू करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या या तारांगणाचे काम हे विशिष्ट स्वरूपाचे आहे. या तारांगणात फुलडोम प्रो या कंपनीचा सर्व्हर व साॅफ्टवेअर बसविण्यात आले होते. मात्र, त्याचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याने हे तारांगण बंद होते.

करोनाच्या काळानंतर बंद पडलेले हे तारांगण सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे महापालिकेने यासाठी पुन्हा ज्या कंपनीने हे तारांगण तयार केले होते त्या कंपनीशी संपर्क साधला. त्यांच्याकडून या कामासाठी अधिकृतपणे नेमलेल्या संस्थेची माहिती महापालिकेला देण्यात आली. त्यानुसार, संबंधित कंपनी या तारांगणाची यंत्रणा तपासणे, साॅफ्टवेअर तपासणे, हार्डवेअर तपासणे, दुरुस्त करणे, या तारांगणासाठी नव्याने कार्यक्रमांची रचना करणे, तसेच पुढील देखभाल-दुरुस्ती करण्याचे काम देण्यात आले आहे.

ही कंपनी या तारांगणासाठी २७ कार्यक्रम तयार करणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील हे कार्यक्रम असणार आहेत. त्यानुसार हे तारांगण सुरू करण्यासाठी पहिल्या वर्षी ३३ लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्यानंतर पुढील चार वर्षे देखभाल दुरूस्तीसाठी ६ लाख ९६ हजार रूपयांचा खर्च कंपनीस दिला जाणार आहे. तर, या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत हे तारांगण सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

Story img Loader