पुणे : गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेली दोन वर्षे एकाच जागी उभ्या असणाऱ्या फिरत्या हौदांची सुविधा यंदा उपलब्ध न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, अचानक महापालिका प्रशासनाच्या वर्तुळात चक्रे फिरली आणि १५० फिरत्या हौदांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च होणार असून अल्पमुदतीची निविदा काढण्यात आली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांची बदली होताच फिरते हौद घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सहा दिवसांसाठी दीड कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याने हा खर्च वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>> पुण्यात आता ई- वाहने सुसाट! राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल
करोना संसर्ग काळात फिरत्या हौदांची संकल्पना राबविण्यात आली. ट्रकवर ठेवण्यात आलेल्या हौदात गणेशमूर्ती विसर्जन करणे, अशी यामागील संकल्पना होती. करोना संसर्ग नियंत्रणात राहिल्यानंतर या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नसल्याचे गेल्या वर्षी स्पष्ट झाले होते. त्यावरून महापालिका प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे यंदा फिरत्या हौदांची सुविधा देण्यात येणार नाही त्याऐवजी कृत्रिम लोखंडी टाक्यांची आणि मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही १५० फिरत्या हौदांसाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी असा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली असून स्वयंसेवी संस्थांनीही फिरत्या हौदांवर आक्षेप घेतले आहेत.
सन २०१९ पर्यंत अनेक वर्षे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन- दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती. ही सर्व विसर्जन यंत्रणा पुरेशी ठरत होती. यंदा करोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन- दान केंद्रे अशी व्यवस्था उपलब्ध असणार आहे. याशिवाय क्षेत्रीय स्तरावर, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व, विविध संस्था आणि व्यक्ती स्वखर्चाने फिरते विसर्जन हौद उपलब्ध करत असतात. त्यानंतरही १५० फिरते हौद घेण्याचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> दहावी-बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रम; प्रवेशांसाठीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर
विसर्जनाची अन्य कोणतीही व्यवस्था नसताना संपूर्ण शहरासाठी २०२० मध्ये ३० तर २०२१ मध्ये ६० फिरते विसर्जन हौद संपूर्ण शहरासाठी पुरसे ठरले होते. गेल्या वर्षीही प्रशासनाने अट्टाहासाने १५० फिरते हौद भाड्याने घेतले होते. तेव्हा विसर्जनासाठी आलेल्या ४,३०,०९१ पैकी जेमतेम १३ टक्के मूर्तींचे विसर्जन या फिरत्या हौदात झाले. ही बाब दुर्लक्षित करून ठेकेदारांच्या आर्थिक फायद्यासाठी फिरते हौद घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
या फिरत्या हौदांची सुविधा पाचवा दिवस ते अकरावा दिवस अशा फक्त सहा दिवसांसाठी असणार आहे. सहावा, आठवा आणि नववा या तीन दिवशी अत्यंत कमी गणपतींचे विसर्जन होते. तरी हे दीडशे विसर्जन हौद ठेवले जाणार आहेत. गणपती उत्सव दहा दिवसांचा असताना अकराव्या दिवशी पण हे फिरते हौद असतील, असे निविदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
हौदांसाठी अल्पमुदतीची निविदा
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी यंदा फिरते हौद घेतले जाणार नाही, असे जाहीर केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली. त्यानंतर अचानक चक्रे फिरली आणि फिरत्या हौदांसाठी अल्पमुदतीची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी तसे आदेश दिल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात आहे.