पुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब अशी ओळख असलेल्या पुणे शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शहराच्या मध्यवर्ती भागात मिळेल त्या ठिकाणी राहून खाजगी अभ्यासिकेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी चढाओढ लागलेली असते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करता यावा, यासाठी अनेक जागा मालकांनी खाजगी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. अभ्यास करण्यासाठी या अभ्यासिकेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुले बसलेली असतात. अभ्यास केला विद्यार्थ्यांचे मागणी मोठी असल्याने अत्यंत कमी जागेत विद्यार्थ्यांना बसण्याची सोय केलेली असते. या अभ्यासिकांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची सतत धावपळ सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी पुणे शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी आणि माफक दरात अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात अनेकांनी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत. त्यासाठी मुलांकडून महिन्याचे शुल्क आकारले जाते. अनेक विद्यार्थ्यांना हे शुल्क देणे परवडत देखील नाही. यासाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध करून देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांनी केला कार्यकाळ पूर्ण
सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ याबरोबर शिवाजीनगर, शास्त्री रस्ता या भागात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी मार्गदर्शन वर्ग भरविले जातात. त्यानंतर संपूर्ण दिवसभर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासिकांमध्ये अभ्यास करत बसतात. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळाले असल्याने त्यांना शांततेमध्ये अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांनी रहिवाशी जागेतच अभ्यासिका सुरू केल्या आहेत. यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच चिंचवड महापालिकेकडे याची नोंदणी देखील करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची खात्री असल्याने गावाकडून मोठ्या संख्येने शहरात येऊन ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, त्या तुलनेत अभ्यासासाठी पुरेशी आणि आवश्यक ती जागा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. गेल्या महिन्यात सदाशिव पेठेतील अभ्यासिकेला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर हा अभ्यासिकांचा प्रश्न चर्चेत आला होता. आगीची घटना घडल्यानंतर शहरातील सर्व अभ्यासिकांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते.
महापालिकेच्या अग्नीशमन दलाने शहरातील अभ्यासिकांचे लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल देखील आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. निवासी जागेत या अभ्यासिका चालविल्या जात असून अनेक ठिकाणी सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे समोर आले आहे. त्यावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना सुरक्षित आणि शांततेमध्ये अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेच्या काही शाळांची जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी काही शाळा देखील निश्चित करण्यात आल्याचे आयुक्त भोसले यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ७०० ते १००० विद्यार्थ्यांसाठी ही जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचे शुल्क देणे परवडत नाही, अशांना येथे प्रवेश देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. यासाठीचे नियोजन सुरू असूल पुढील काही दिवसातच महापालिकेच्या प्रयत्नांना यश मिळेल, असा विश्वासही आयुक्त डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.
े
शहरात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे हुशार असूनही अनेकांना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेने अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.