पुणे : पुणे महापालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा, अतिक्रमण विभाग, यासह आरोग्य, मल:निसारण (ड्रेनेज), आकाशचिन्ह परवाना या सेवादेखील नागरिकांना संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते मंगळवारी http://www.pmc.gov.in या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला १०० दिवसांत नागरी सेवा लोकाभिमुख करण्याचे आदेश दिले आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने महापालिकेच्या संकेतस्थळाचे नूतनीकरण केले आहे. यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर केवळ मिळकतकर, जन्म, मृत्यू दाखले, बांधकाम विभागाकडील परवान्यांच्या सेवा ऑनलाईन दिल्या जात होत्या. मात्र, आता संकेतस्थळ अद्ययावत झाल्याने इतर विभागांच्या सेवाही ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या आणि जलदगतीने सुविधा मिळणार आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

संकेतस्थळ सतत अद्ययावत ठेवणार

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील अभियंत्यांनीच या संकेतस्थळाचे डिझाईन तयार केले आहे. सर्वसाधारण दरवर्षी ६७ लाख नागरिक महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट देतात. यापैकी ६० टक्के नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आहेत. तर, बाहेर देशातील १० ते १५ टक्के नागरिकही येथे भेट देतात. हे नवीन संकेतस्थळ कायम अद्ययावत कसे राहील, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त राहुल जगताप यांनी सांगितले. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूददेखील करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.