जी २० परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने पर्यावरणाबाबत चर्चा करण्यात आली असताना चौक सुशोभीकरणासाठी महापालिकेने प्लास्टिक पताकांचा वापर केल्याचे पुढे आले आहे. प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या महापालिकेकडून सुशोभीकरणासाठी प्लास्टिकचा वापर केल्याचे पुढे आले आहे.
जी २० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने शहरात सुशोभीकरण मोहीम राबविली. मात्र सुशोभीकरण करताना मात्र विचाराला तिलांजली दिल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उघडकीस आणले आहे.
हेही वाचा >>> खासदार गिरीश बापट रुग्णालयातून थेट जनसंपर्क कार्यालयात !
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकापासून भोसले नगर चौकापर्यंत मेट्रोच्या पत्र्यांच्या पताकांना माळा लावण्यात आल्या आहेत. जी २० परिषदेच्या निमित्ताने पुण्यात दोन दिवस झालेल्या बैठकीत पर्यावरणावर चर्चा करण्यात आली. अनेक देशाच्या प्रतिनिधींनीही पर्यावरणाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र बैठकीपासून शंभर मीटर अंतरावर प्लास्टिक पताकांच्या माळा लावण्याचा प्रकार म्हणजे महापालिका प्रशासनाने सारासार विचारशक्ती गमाविल्याचे लक्षण आहे, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले. राज्य शासनाच्या कायद्यानुसार प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र स्वत: महापालिका सुशोभीकरणासाठी प्लास्टिक पताका लावत आहेत, ही बाब निषेधार्थ आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी प्लास्टिक पताका लावल्या आहेत, त्यांच्यावर वैयक्तिक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही विवेक वेलणकर यांनी केली आहे.