काय चाललंय  प्रभागात?

प्रभाग क्र. २४ रामटेकडी-सय्यदनगर

शहरातील प्रभागांची रचना करताना तीन सदरस्यांचे जे प्रभाग करण्यात आले, त्यापैकी एक असलेल्या रामटेकडी आणि सय्यदनगर (प्रभाग क्रमांक २४) प्रभागात बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. तीन सदस्यांचा हा प्रभाग नव्याने अस्तित्वात आला असून यंदाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार स्पर्धा होणार आहे. प्रभागाची मोडतोड झाल्यामुळे येथे तुलनेने तशी भाजपला संधी कमीच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत स्पर्धेतून तसेच एकमेकांच्या विरोधातील लढतीमुळे सर्वच विद्यमान नगरसेवकांपुढे अडचण निर्माण झाली आहे.

रामटेकडी आणि सय्यदनगर प्रभागातील बहुतांश भाग हा झोपडपट्टी आणि वसाहतींचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी भाजपसह अन्य पक्षांनी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. पण मर्यादित विस्ताराशिवाय त्यांच्या हाती काही लागलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आनंद अलकुंटे, विजया कापरे यांचा सध्याचा प्रभाग क्रमांक ४२, राष्ट्रवादीचे फारूक इनामदार आणि काँग्रेसच्या विजया वाडकर यांच्या प्रभाग क्रमांक ४५, काँग्रेसच्या कविता शिवरकर, सतीश लोंढे यांचा प्रभाग क्रमांक ४६ चा काही भाग एकत्रित करून या नव्या प्रभागाची निर्मिती झाली आहे. वैदुवाडी, डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान, पुणे सोलापूर रस्ता, रामटेकडी, रामटेकडी औद्योगिक वसाहत, रामनगर वसाहत, सुरक्षानगर, समर्थनगर, सय्यदनगर, हांडेवाडी रस्ता आदी प्रमुख भागांचा यात समावेश आहे. प्रभागातील तीन जागांपैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी खुली असून एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण गटासाठी खुली आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमानांमध्येच समारोसमोर लढत होण्याची शक्यता आहे. या प्रभागात तीन जागा असल्यामुळे विद्यमान सहा नगरसेवकांपैकी तीन जणच महापालिकेवर या प्रभागातून जाऊ शकतात.

जागा मर्यादित असल्या, तरी या दोन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे. त्यामुळे

एकमेकांचा पत्ता काटण्याचाही प्रयत्न सुरू झाला असल्याचे चित्र या प्रभागातून दिसून येत आहे. रामटेकडी आणि सय्यदनगर भागात मोठय़ा प्रमाणात कष्टकरी वर्गाचे प्राबल्य असून मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी आहे. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येते.

या प्रभागात वर्चस्व स्थापन करण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. या वेळच्या निवडणुकीसाठी भाजपच्या लोकप्रियतेच्या लाटेवर निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत आनंद अलकुंटे यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेले काँग्रेसचे माजी नगरसेक दत्तात्रय ससाणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र सध्याची प्रभागरचना लक्षात घेता पूर्वीच्या प्रभागाची मोडतोड झाल्यामुळे त्यांच्यासमोरही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान राहणार आहे.

Story img Loader