प्रभाग क्रमांक ४ खराडी-चंदननगर

निवडणुकीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. ही रचना बहुतांश सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खराडी-चंदननगर हा त्यांचा बालेकिल्ला राखणार, असे वाटत असतानाच प्रभागांची रचना अंतिम जाहीर होताना विविध बदल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभागात शिवसेना-भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेऊन गावकी आणि भावकीच्या राजकारणावरच राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिक जोर राहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेऊन विद्यमान नगरसेवकांसह काही इच्छुक भाजपच्या वाटेवर असल्याचेही चित्र या प्रभागात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीला पठारे, महेंद्र पठारे, सुमन पठारे आणि सचिन भगत यांचा मिळून हा खराडी-चंदननगर प्रभाग करण्यात आला. माजी आमदार बापू पठारे यांचे प्राबल्य असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. खराडी-चंदननगर भागात पठारेंच्या नातेवाइकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे ही बाब त्यांच्या जमेची होती. त्यानंतर झालेल्या फेररचनेत गणेशनगर हा भाग खराडी-चंदननगरला जोडण्यात आला. त्यामुळे किमान दहा ते बारा हजार शिवसेनेची मते या प्रभागात आली. विधानसभा निवडणुकीत भाजपची या प्रभागातील ताकद वाढली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे बदललेल्या रचनेत भाजप-सेना राष्ट्रवादी काँग्रेसला शह देईल, अशी सध्याची परिस्थिती आहे.

ठुबेनगर, प्रतीकनगर, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, बोराटे वस्ती, तुकारामनगर, पंढरीनगर, शांतीनगर, तुळजाभवानीनगर अशा काही भागाचा या प्रभागात समावेश आहे. हा प्रभाग मोठय़ा प्रमाणावरील सोसायटय़ांचा आहे. त्यातच अनुसूचित जातीचे आरक्षण असल्यामुळे राजकारणाची गणितेही काही प्रमाणात बदलली आहेत. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्लाजिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादीतील मातब्बर उमेदवारांना घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते कोणाला आणि काय शब्द देतात यावरच या प्रभागातील निवडणुकीचे गणित ठरणार असून त्यादृष्टीनेच अन्य पक्षांकडूनही व्यूहरचना आखण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बहुतांश उमेदवार भाजपकडूनच निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. शिवसेनेची ताकद या प्रभागात वाढली असली तरी वाढत्या ताकदीचे प्रतििबब मतपेटीतून किती उमटणार याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. भाजपकडे या प्रभागात तुलनेने तुल्यबळ उमेदवार नव्हते. त्यामुळेच राष्ट्रवादीतील उमेदवारांना खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. तर भाजप, राष्ट्रवादीमधील नाराजांना आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न नाममात्र होत असलेल्या काँग्रेसकडून सुरू झाला आहे.

Story img Loader