लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : जुन्या गाद्या, उशा, खराब झालेले कपडे, तसेच विविध प्रकारचे फर्निचर अशा कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिकेला अडचणींना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने अशा वस्तूंवर प्रक्रिया करणारा स्वतंत्र प्रकल्प उभारला जाणार आहे.

या नवीन प्रकल्पातून चटया, बसकण, पायपुसणी आदी गृहोपयोगी वस्तू तयार केल्या जाणार आहेत. तसेच यामुळे जुने फर्निचर, कपडे, फायबर च्या वस्तू, काचा, घरातील जुन्या गाद्या उशा यांची विल्हेवाट लागण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरात दररोज २२०० ते २३०० टन कचरा गोळा केला जातो. यामध्ये सुका कचरा ११०० ते १२०० टन, तर उरलेला ओला कचरा असतो. कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिका दर वर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करते. दररोज गोळा होणाऱ्या सुक्या कचऱ्यामध्ये जुने फर्निचर, टाकाऊ वस्तू, गाद्या, उशा, चादरी यांचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के म्हणजे सुमारे ७५ ते १०० टन इतके आहे.

हा कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावताना महापालिकेला अनेक अडचणी येतात. या कचऱ्यामुळे यंत्रणेवर ताण येऊन ती कोलमडून पडण्याचे प्रकार घडतात. शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अनेकदा असे घडले आहे. त्यामुळे हा कचरा घेण्यास प्रकल्प चालविणाऱ्यांकडून विरोध केला जातो. परिणामी, हा कचरा घेण्यास कचरावेचकही टाळाटाळ करतात.

वापरात नसलेले फर्निचर, जुने कपडे रस्त्यांवर पडून राहतात. काही ओसाड भागांत, मोकळ्या मैदानांवर हा कचरा टाकल्याचे सर्रास आढळते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दररोज असा सुमारे १०० टन कचरा पडलेला असतो. अस्तित्वातील प्रक्रिया प्रकल्पांत यावर प्रक्रिया होत नसल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

शहराच्या पश्चिम भागातील जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प ७५ टन क्षमतेचा आहे. तो तातडीने कार्यान्वित व्हावा, यासाठी महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात याचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूददेखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पात प्रक्रिया झालेल्या कचऱ्यातून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यात येणार आहेत.

घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, घरातील जुने फर्निचर, गाद्या, उशा, तसेच जुने कपडे यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. त्यामुळे शहरातील मोकळ्या आणि ओसाड जागांवर वर्षानुवर्षे हा कचरा पडून राहतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

शहरात दररोज तयार होणारा कचरा : २३०० टन

सुका कचरा : ११०० ते १२०० टन

ओला कचरा : १००० ते ११०० टन

फर्निचर, जुने कपडे, गाद्या यांचा कचरा : ७५ ते १०० टन