लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्वतंत्रपणे पाणी योजना राबविली जात आहे. मात्र, या दोन्ही गावांची मिळून नगर परिषद करण्याची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यामुळे यापुढे या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीचा आर्थिक भार महापालिकेवर टाकण्यात येऊ नये, असा अभिप्राय महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाला दिला आहे. त्यावर नगरविकास विभागाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी दोन्ही गावांची नगर परिषद होणार असली, तरी महापालिकेचा कचरा या गावाच्या हद्दीत असलेल्या डेपोमध्ये येत असल्याने पाणी योजनेचे परिचलन, तसेच देखभाल-दुरुस्तीचा खर्च महापालिकेने करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या दोन्ही गांवांसाठी ३३ दशलक्ष लिटर क्षमतेची पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा खर्चही महापालिकेने उचलला असून, यात जलवाहिन्या, तसेच साठवणूक टाक्यांची कामे केली जात आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत महापालिकेने ३१ कोटींचा निधी दिला आहे.
मात्र पाणी योजनेचे परिचलन, देखभाल-दुरुस्तीचा खर्च महापालिकने करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यावर राज्य शासनाकडून महापालिकेचा अभिप्राय मागविण्यात आला होता. त्या संदर्भात आर्थिक भार महापालिकेवर नको, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.
हेही वाचा… ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मौनीबाबा’ झाले जिल्ह्यातील अधिकारी!… जाणून घ्या कारण
सध्या या दोन्ही गावांना पालिकेकडून दररोज २०० टँकर फेऱ्यांद्वारे पाणी दिले जात आहे. मात्र, या गावांची पाणी योजना सुरू होताच या दोन्ही गावांचे टँकर बंद केले जाणार आहेत. ही दोन्ही गावे महापालिकेच्या कचरा डेपोने बाधित आहे. या दोन्ही गावांचा महापालिका हद्दीत समावेश होण्यापूर्वीपासूनच महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार महापालिकेवर नको, असे नमूद करण्यात आले आहे.