पिंपरी : वाढदिवस, कोणतेही कार्यक्रम, सणानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेची परवानगी न घेता फलक, जाहिराती, पोस्टर्स लावणाऱ्यांंवर कार्यक्रमाच्या दिवसापूर्वीच दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. अनधिकृत फलकांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभागनिहाय नागरिकांची समिती स्थापन केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याबाबत आयुक्तांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यावेळी उपस्थित होते. अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या कमानी, मंडप, झेंडे, फलकाबरोबरच खासगी, सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, फलक, पोस्टर, किऑक्सबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी. कारवाईचे छायाचित्र, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

हेही वाचा…पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?

परवानाधारक होर्डिंग चालकांनी फलकावर परवाना क्रमांक, परवाना कालावधी, परवान्याचे ठिकाण आणि क्यू आर कोड ठळकपणे दिसेल अशा दर्शनी ठिकाणी असणे बंधनकारक आहे. याबाबतची खातरजमा संबंधित अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. विविध कामांसाठी तसेच विविध सणांच्या दरम्यान तात्पुरते बूथ किंवा मंडप उभारण्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्यावर कोणतेही होर्डिंग, जाहिराती लावता येणार नाहीत. या अटीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अनधिकृत फलक, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स अशा अनधिकृत बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी प्रभागनिहाय नागरिकांची समिती स्थापन केली जाणार आहे. अनधिकृतरीत्या उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांंवर प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थाचा वापर केला असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा…पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

परवानगीसाठी क्षेत्रीय कार्यालयात अर्ज

नवीन जाहिरात फलक उभारणे तसेच पूर्वी दिलेल्या जाहिरात फलकाचे नूतनीकरण करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल करावे लागणार आहेत. परवाना निरीक्षक, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून अहवाल सादर करावा. प्रस्तावाची तपासणी करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव आकाशचिन्ह व परवाना विभागप्रमुखांकडे मंजुरीसाठी सादर करावे लागणार आहेत.

तक्रारीसाठी हेल्पलाइन

शहरातील अनधिकृत फलक, जाहिराती- घोषणा फलकाबाबत टोल फ्री क्रमांक ८८८८००६६६६, संदेश आणि व्हॉटस ॲपसाठी ९८२३११८०९० हा क्रमांक असून सारथी हेल्पलाइन ०२० – ६७३३३३३३ किंवा ०२०- २८३३३३३३ याद्वारे नागरिक तक्रार दाखल करू शकतात. तसेच छायाचित्रासह तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर देखील व्यवस्था करण्यात आली आहे. अनधिकृत फलक उभारून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation will take action against events birthdays or festivals banners in city pune print news ggy 03 sud 02