पुणे : कर्वेनगर भागातील नदीकाठच्या बाजूचा पाणंद रस्ता असलेल्या सिद्धिविनायक महाविद्यालय ते कमिन्स महाविद्यालय या अरुंद रस्त्याचे  महापालिकेच्या वतीने रुंदीकरण करण्यात आले. महापालिकेच्या पथ विभागासह अतिक्रमण विभाग, बांधकाम विभागाने एकत्रित कारवाई करून रस्ता रुंद केला. या कारवाईमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची सीमाभिंत आणि त्या समोरील दुकाने काढून टाकण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या तीन विभागांनी एकत्र येऊन या भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण केले. रस्ता रुंद होऊन नागरिकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी कमिन्स महाविद्यालयाची सीमाभिंत तसेच समोरच्या बाजूला सुरू करण्यात आलेली दुकाने काढून टाकून रस्ता रुंद करण्यात आला. यामुळे या भागातील रस्त्याची ‘बाॅटल नेकॅ स्थिती मोकळी होणार आहे. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. महापालिका प्रशासनाने ही कारवाई करत हा अरुंद रस्ता रुंद केला आहे. यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे.

कर्वेनगर परिसरात जाण्यासाठी राजाराम पुलाकडून १२ मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा रस्ता पुढे वारजेकडे जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गल्ल्या आहेत. त्या चिंचोळ्या असल्याने वाहतूक कोंडी होते. हा रस्ता सिद्धिविनायक महाविद्यालय व कमिन्स महाविद्यालया समोरील काही भागात प्रत्यक्षात ८ ते ९ मीटरच रुंद होता. त्यामुळे वारजे आणि राजाराम पुलाकडून आलेल्या वाहनांची या भागात गर्दी होऊन या परिसरात सतत कोंडी निर्माण होत होती. या भागातील काही मिळकतींमध्ये व्यावसायिक दुकाने सुरू केली आहेत. त्याचे पार्किंग रस्त्यावरच होते. परिणामी सकाळ आणि सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

या रस्त्याचे रुंदीकरण करुन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी, अशी मागणी या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करत महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने या रस्ता रुंदीकरणासाठी संबंधितांना नोटीसही दिल्या. त्यानुसार प्रशासनाने या भागात कारवाई केली. यामध्ये कर्वे शिक्षण संस्थेची भिंत तसेच रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली आठ ते दहा बांधकामे काढत रस्त्याचे रुंदीकरण केले. त्यामुळे हा रस्ता आता १२ मीटरचा होणार वाहनांचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिसरातील रस्ता रुंद झाल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्याही सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college pune print news ccm 82 zws