लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मिळकतकर भरण्यासाठी नोटिसा बजावूनदेखील मिळकतकर न भरल्यामुळे जप्त केलेल्या १०० मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकतकर विभागाने गेल्या वर्षी जप्त केल्या आहेत.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २३०० कोटी रुपयांचे उत्पन्न गाठण्यात मिळकतकर विभागाला यश आले. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. गेल्या वर्षी मिळकतकर न भरणाऱ्या शंभर मिळकती महापालिकेने जप्त केल्या आहेत. या जप्त मिळकतींचा लिलाव करून त्यामधून थकबाकी वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी मिळकतकर विभागाने लिलाव जाहीर केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.
गेल्या वर्षी जप्त करण्यात आलेल्या ९० ते १०० मिळकतींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर लिलाव करण्याची प्रक्रिया पुढे सरकली नव्हती. आता ही प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या मिळकतींवर बोजा चढविण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आठ दिवस अगोदर लिलावाची तारीख जाहीर केली जाईल. या काळात थकबाकीदारांनी थकबाकीची रक्कम महापालिकेकडे भरल्यास त्यांची मालमत्ता लिलावामधून वगळण्यात येईल, असे मिळकत कर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाल्या, महापालिकेच्या मिळकतकर विभागाने गेल्या वर्षी जप्त केलेल्या मिळकतींचे मूल्यांकन झालेले आहे. लवकरच या मिळकतींची लिलाव प्रक्रिया पूर्ण करून थकबाकी वसूल केली जाणार आहे. लिलाव होणाऱ्या मिळकतदारांनी थकबाकी भरल्यास त्या मिळकतींना लिलावामधून वगळले जाईल.