लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. मिळकतकराची वसुली करण्यासाठी मिळकतकर थकविणाऱ्यांच्या दारात महापालिका बँड वाजवून त्यांच्या मालमत्ता सील करीत आहे. या मोहिमेत गेल्या १८ दिवसांत २७ मिळकती सील केल्या आहेत. तर, ३१७ मिळकतधारकांकडून सुमारे ४० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

महापालिकेचा मिळकत कर बुडविणाऱ्यांविरोधात महापालिकेने मोहीम उघडली आहे. महापालिकेचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबधितांच्या मिळकतीसमोर बँड वाजविला जात असून, मिळकती सील केल्या जात आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

आणखी वाचा-पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला पकडले, पिस्तुलासह काडतूस जप्त

शहरातील १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकराची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत ८ लाख ८४ हजार मिळकतधारकांनी सुमारे एक हजार ८४१ कोटी रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर उर्वरीत सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला २ हजार ७२७ कोटींचे कर वसूलीचे उदिष्ट देण्यात आले आहे.

यातील ८५० कोटींच्या वसुलीचे उदिष्ट अद्याप बाकी आहे. त्यामुळे कर संकलन विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. यामधून दिवसाला दोन ते अडीच कोटींची वसुली होत असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ

महापालिकेच्या मिळकतकर विभागाने यासाठी पथके तयार केली असून संबंधित थकबाकीदाराला यापूर्वी थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. पालिकेने नोटीस बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करत थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींची यादी महापालिकेने तयार केली आहे. त्यानुसार संबंधित मिळकतदाराकडे जाऊन मिळकतकर वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यापुढील काळातही ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporations sealed 27 properties in 18 days pune print news ccm 82 mrj