इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) आरक्षणासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत खुल्या गटातील उमेदावरांच्या जागांची अदलाबदल होणार आहे. महापालिकेच्या १७३ जागांपैकी ४७ जागा ओबीसींसाठी आरक्षित असतील. आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे २५ जागांवरील आरक्षण यापूर्वीच निश्चित केल्याने ते कायम ठेवून १४८ जागांमधून ओबीसींचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
इतर मागासवर्गीय समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देण्यासाठी बांठिया आयोगाने काही शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याने आरक्षणासह आगामी निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे ओबीसी उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी खुल्या गटातील जागांवरील उमेदवारांची अदलाबदल होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
५८ प्रभागातून १७३ नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार –
आगामी निवडणुकीसाठी ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहेत. यातील ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचा एक (त्रिसदस्यीय प्रभाग) आणि एक प्रभाग हा दोन नगरसेवकांचा (द्वीसदस्यीय प्रभाग) असा आहे. एकूण १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या आरक्षित जागांव्यतिरिक्त महिलांसाठीच्या आणि ओबीसीं प्रवर्गाच्या जागांसाठी पुन्हा नव्याने सोडत काढली जाणार आहे.
२७ टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळणार –
महापालिका निवडणुकीत २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या ४७ होणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीो २५ प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित झाल्याने ४७ जागांसाठी ३४ प्रभागातील प्रत्येकी एक जागा ओबीसी आरक्षणासाठी आरक्षित ठेवली जाईल. ही जागा ‘अ’ क्रमांकाची असेल. उर्वरीत १३ जागंसाठी २३ प्रभागांमध्ये चिठ्ठ्या टाकून ‘ब’ क्रमांकाची जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केली जाईल. यामुळे महिला आरक्षणामधअयेही बदल होणार असून महिला आरक्षणाची सोडतही नव्याने काढावी लागणार आहे.
अशी असेल प्रक्रिया –
ओबीसीच्या ४७ जागांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील. त्यामुळे २४ जागांवर ओबीसी महिला आरक्षण असेल. सोडत काढताना सर्वप्रथम ओबीसी खुला गट, त्यानंतर ओबीसी महिला आरक्षण काढले जाईल. त्यानंतर उर्वरीत १०१ जागांमधून सर्वसाधरण गटातील महिलांसाठीचा आरक्षण प्रथम निश्चित केले जाईल. त्यामुळे खुल्या गटातील जागांचे गणित बदलणार आहे. १७३ पैकी २५ जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पुरूष आणि महिलांसाठी यापूर्वीच आरक्षित करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठीच्या आणि ओबीसी प्रवर्गाच्या जागांसाठी पुन्हा नव्याने सोडत –
“ओबीसी आरक्षणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षित जागांव्यतिरिक्त महिलांसाठीच्या आणि ओबीसी प्रवर्गाच्या जागांसाठी पुन्हा नव्याने सोडत काढली जाईल.” असं महापालिका निवडणूक शाखा उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी सांगितलं आहे.